म्हसवड पालिका निवडणूक : सिध्दनाथ नागरीक विकास आघाडीचा प्रचार जोमात
व्हिजन २४ तास न्यूज, संपादक अहमद मुल्ला
सचिन मंगरुळे
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड नगरपरिषद निवडणुकीत सिध्दनाथ नागरीक विकास आघाडीने प्रचाराचा जोर वाढवला असून शहरातील निवडणूक वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. माजी मंत्री महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई व प्रा. कविता म्हेत्रे यांच्या उपस्थितीने आघाडीचा प्रचार अधिक गती घेत आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. या संवाद दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक प्रभागांत मोठी गर्दी उसळल्याचे दिसत आहे.
माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांचे राजकीय वारसा लाभलेली भुवनेश्वरी राजेमाने या निवडणुकीत विशेष चर्चेत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या पतींनी—तेजसिंह राजेमाने—प्रचाराची सूत्रे हाती घेत कार्यकर्त्यांसह नागरिकांपर्यंत वेगाने पोहचण्याची मोहीम सुरू केली आहे.
राजेमाने घराण्याची परंपरागत प्रतिष्ठा, सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि मतदारांतील विश्वास यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यंदा “राजवाड्यात सत्ता पुनर्स्थापना होण्याची शक्यता” अशी चर्चा जोर धरत असून, आघाडीच्या प्रचाराला मिळत असलेला मोठा प्रतिसाद या चर्चेला आणखी चालना देत आहे.
प्रचारफेरीत महिलांचे, तरुणांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. शहरातील विविध भागांतील मतदारांनी विकासावर आधारित आश्वासनांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत सिध्दनाथ नागरीक विकास आघाडीची भूमिका शहराच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून मतदारांना आशादायक वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
–

