शेखर गोरे यांची पालिका निवडणुकीत धमाकेदार एन्ट्री; उमेदवारी अर्ज दाखल करताना ताकद दाखवली
म्हसवड दि. १४ व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड
म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात आज अखेर खरी गजबज दिसू लागली असून, माण तालुक्याचे युवा नेतृत्व आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनासह निवडणूक प्रक्रियेत भव्य एन्ट्री नोंदवली. मागील चार दिवसांपासून शांत असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला आज शेखर गोरे यांच्या उपस्थितीने वेगळेच वळण मिळाले.
शहरातील प्रमुख मार्गावरून मोठ्या उत्साहात आणि शेकडो समर्थकांसह निघालेल्या शक्तीप्रदर्शनाच्या रॅलीतून गोरे यांनी आपल्या गटाचे उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यांच्या या एन्ट्रीमुळे म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा राजकीय पट पूर्णपणे हलला असून, पुढील समीकरणांना नवे आयाम मिळाले आहेत.
पहिल्याच दिवशी मजबूत तयारीचे दर्शन
निवडणुकीत उतरायचे ठरवल्यानंतर गोरे यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता ठाम भूमिका घेतली आहे. नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांत आपल्या उमेदवारांच्या नावांचे अर्ज दाखल करून त्यांनी लढाई गंभीरपणे आणि ताकदीने लढण्याचा संकेत दिला.
राजकारणातील ‘वादळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेखर गोरे यांच्या हालचालीकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. ते कुठल्या पॅनेलला पाठिंबा देतील किंवा थेट लढाईत उतरतील याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पॅनल उभा करत मैदानात प्रवेश केला.
७ उमेदवारांचे अर्ज दाखल
आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सौ. गौरी विशाल माने यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रभागांत पुढील उमेदवारांनी आपली नावे नोंदवली आहेत —
प्रभाग १: सोमनाथ अजिनाथ कवी,प्रभाग २ (अ): किर्ती आनंदा मासाळ,प्रभाग २ (ब): आनंदा महादेव मासाळ,प्रभाग ३: विक्रम लोखंडे,प्रभाग ५: मोनिका महेश लिंगे,प्रभाग ७: प्रतिक्षा सोमनाथ कवी,प्रभाग ८: धनाजी रामचंद्र माने
एकाच दिवशी सात उमेदवारांचे अर्ज दाखल करून गोरे यांनी प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळीला सुरूवात करून दिली आहे.
चार दिवसांची निवडणूक शांतता भंगली
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होऊन चार दिवस उलटूनही कोणत्याही प्रमुख पक्षांकडून फारशी हालचाल दिसत नव्हती. मात्र आज गोरे गटाने दाखवलेल्या उपस्थितीने आणि घेतलेल्या पुढाकारामुळे निवडणुकीची धडक रुजली असून पुढील काही दिवसांत इतर पक्ष व आघाड्यांचेही उमेदवार सक्रिय होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेखर गोरे यांच्या या रॉयल एन्ट्रीमुळे म्हसवडमधील राजकीय वातावरण तापले असून नगरपरिषदेची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

