राजकीय मौन, कार्यकर्त्यांची घालमेल – म्हसवडचा मतदार बुचकुळ्यात!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूजसंपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी :

 

म्हसवड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजून चार दिवस उलटले तरी शहरात अजूनही राजकीय चित्र धुसरच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवार, १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडून ना नगराध्यक्षपदाचे नाव स्पष्ट, ना नगरसेवकांची यादी जाहीर — परिणामी म्हसवड शहरात ‘राजकीय मौन’ आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून राजकीय गल्लीबोळात चर्चा आणि अफवांचा पूर आलेला आहे. काही नेते शहरात दिसेनासे झाले आहेत, तर काही नव्या गटांच्या दारात दर्शन देत आहेत. कालपर्यंत “मी अमुक नेत्याचा विश्वासू” म्हणणारे आज दुसऱ्याच गटात ‘सेवा आणि विकास’चा नारा देताना दिसत आहेत. कुणी कुणाच्या छत्राखाली आहे हे समजेनासं झालंय. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी झालेली धडपड, गुप्त बैठका आणि रात्रीची भेटीगाठी यामुळे म्हसवडच्या राजकारणाचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

   दरम्यान, अनेक प्रामाणिक, अभ्यासू आणि कार्यक्षम इच्छुक उमेदवारही या निवडणुकीत उतरण्यास तयार आहेत. पण त्यांच्यासमोर पैशाचं मोठं आव्हान उभं आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचार आणि जनसंपर्कासाठी प्रचंड आर्थिक खर्च अपेक्षित असल्याने कर्तृत्व असूनही अनेक जण मागे हटताना दिसतात. “आम्ही काम करतो, पण पैसे नाहीत, मग निवडणूक कशी लढवायची?” असा प्रश्न त्यांच्याच तोंडून ऐकू येतो.

      शहरात दुसऱ्या बाजूला ठेकेदार, दलाल आणि टक्केवारीखोर गट आपले पॅनेल तयार करत आहेत. काहींच्या प्रसिद्धी मोहिमा गुपचूप सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी काही जण “मी नाही त्यातला” म्हणत स्वच्छ प्रतिमेचा मुखवटा लावून पुढे सरकत आहेत. “सेवाभावी” असे मोठे फलक झळकतात, पण आतून राजकीय व्यवहार आणि सत्तेचा लोभ झिरपत असतो.

म्हसवडच्या मतदारांना या सगळ्या खेळाची जाणीव आहे. गेल्या काही वर्षांत रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, आणि कचऱ्याचा ढीग या तिघांनी नागरिकांचा नक्कीच संयम संपवला आहे. मतदारांना आता पक्षापेक्षा काम करणारा नेता हवा आहे, पण गोंधळाच्या या धुक्यात तो चेहरा ओळखणे कठीण झालं आहे.

    नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार पुढील काही दिवसांत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल होताच शहराचे राजकीय समीकरण बदलू शकते. सध्या मात्र म्हसवडमध्ये एकच प्रश्न सर्वांच्या चर्चेत आहे – “कोणाचा पक्ष उघडणार, कोणाची उमेदवारी टिकणार, आणि अखेर जनतेचा विश्वास कोण जिंकणार?”

   या राजकीय गोंधळात मतदार मात्र शांतपणे पाहत आहेत. शहरात कुजबुज आहे – “हातात गुलदस्ता कुणाचा, आणि दांडा कुणाच्या वाट्याला?” याचं उत्तर दि. २ डिसेंबरच्या मतदानपेटीतूनच बाहेर येणार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *