धार्मिक एकतेचा सुंदर नमुना : आमिना मस्जिद, भगवान गल्ली म्हसवड यांच्या वतीने श्री सिद्धनाथ मंदिरात उपवास करणाऱ्यांना फळवाटप

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड (प्रतिनिधी अहमद मुल्ला) –
धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्य यांचे उदाहरण म्हणून म्हसवड शहरातील भगवान गल्ली येथील आमिना मस्जिद यांच्या वतीने शुक्रवारी नमाज पठण झाल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री सिद्धनाथ मंदिरात उपवास करणाऱ्या भाविकांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाने दोन्ही समाजांमधील प्रेम, परस्पर आदर आणि एकोप्याचा संदेश दिला.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपवास करीत होते. त्यांच्याप्रती सहकार्य आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी आमिना मस्जिद समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला.

या वेळी इर्षाद काझी, बशीर मुल्ला, इमरान मुल्ला, आमिर मुल्ला, शब्बीर मुल्ला, हबीब काझी यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते. तसेच श्री सिद्धनाथ मंदिरातील गुरव बांधवांनी या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

शहरातील नागरिकांनी या अनोख्या फळवाटप उपक्रमाचे कौतुक केले असून, “धर्म वेगळे असले तरी मानवता हीच खरी धर्म आहे” हा संदेश या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला.

या उपक्रमामुळे म्हसवड शहरात धार्मिक ऐक्य, बंधुभाव आणि सामंजस्याची नवी परंपरा रुजताना दिसली आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *