तारळी धरणातील पाणी वापरून होणाऱ्या अदानी ऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा संताप प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा – डॉ. भारत पाटणकर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
सातारा/कराड,:- प्रतिनिधी
तारळी धरणातील पाणी वापरून लाभक्षेत्रातील शेतकरी व स्थानिक चार गावांना उध्वस्त करणारा अदानी-तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्प (PSHP) तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
तारळे येथील श्री संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे झालेल्या प्रकल्पविरोधी शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
🔹 डॉ. पाटणकर म्हणाले –
“हा प्रकल्प कोणत्याही शेतकऱ्याला, स्थानिक नागरिकांना किंवा पर्यावरणाला फायदा देणारा नाही; फक्त अदानी कंपनीच्या हिताचा आहे. धरणाच्या अर्ध्या साठ्याइतके पाणी कायम या प्रकल्पासाठी राखीव राहणार आहे, त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळणार नाही. धरणालाच गळती असून यामुळे धरण सुरक्षिततेलाही धोका आहे. प्रकल्प रद्द करून लाभक्षेत्रातील गावांना लिफ्ट सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे.”
🔹 ग्रामस्थांचे प्रश्न पुढे मांडताना श्रीपाद धर्माधिकारी म्हणाले –
“जमिनी जाणार त्यांचे पुनर्वसन कसे होणार, पर्यावरणाचा व जंगल-वन्यप्राण्यांचा प्रश्न काय, रोजगार किती मिळणार, स्थानिकांची सहमती घेतली का – या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे शासनाने दिलेली नाहीत. पारदर्शक चर्चेशिवाय हा प्रकल्प पुढे जाऊ नये.”
🔹 के. जे. जॉय यांनी निदर्शनास आणले –
“१५० हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी लागणार असून यामुळे पर्यावरण, जैवविविधता, नदीप्रवाह व हजारो एकर जमिनींवर गंभीर परिणाम होणार आहेत. यासाठी शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्यासह तज्ज्ञांनीही विरोध दर्शविला आहे.”
🔹 डॉ. प्रशांत पन्हाळकर म्हणाले –
“२०१० पासून धरणात साठलेले पाणी याच प्रकल्पाकडे वळवले गेले आहे. परिणामी ५० हजार हेक्टर सिंचन घटले असून बाधित गावांसह लाभक्षेत्रातील १८ हजार हेक्टर जमीन कोरडवाहू होण्याची भीती आहे.”
🔹 स्थानिक शेतकऱ्यांचा आक्रोश –
किरण लोहकरे यांनी माळीण दुर्घटनेचा संदर्भ देत सावध राहण्याचे आवाहन केले. तर बाळासाहेब सपकाळ यांनी प्रकल्पाविरोधातील तांत्रिक व कायदेशीर त्रुटी सविस्तर मांडून, शासन व कंपनीने दाखविलेला बेपर्वाईचा प्रत्यय घडवून दिला.
यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपले अनुभव व चिंता मांडत या प्रकल्पामुळे संपूर्ण तारळी खोऱ्यातील १०२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न गंभीर होईल, असे सांगितले.
मेळाव्यात प्रकल्पाविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक ३० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पाली येथे घेण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी लाभक्षेत्रातील तसेच बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

