पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचे माण तालुक्यात उत्साहात स्वागत; अन्नदान, आरोग्यसेवा, आणि भक्तीचा महापूर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
सुशील त्रिगुणे
माण (प्रतिनिधी):
पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पायी निघालेल्या वारकरी दिंडींचे माण तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती आणि सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे या भक्तिमय यात्रेला प्रेम आणि सेवाभावाने साथ दिली.

 

गेल्या दोन दिवसांत माण तालुक्यातून सेवागिरी महाराज दिंडी (पुसेगाव), इंचगिरी रसाळ संप्रदाय दिंडी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडी, घाडगेनाथ महाराज कोळे दिंडी यांसह एकूण सुमारे 70 ते 80 हजार वारकरी पंढरपूरच्या दिशेने गेले. टाळ, मृदुंग आणि जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण तालुक्यात भक्तीचा महापूर अनुभवायला मिळाला.

म्हसवड परिसरात गणेश रसाळ, सर्जेराव माने, धनाजी माने या दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले. वैभव गणेश मंडळाने ज्ञानोबा माऊली गोजेगावकर दिंडीतील लोकांना भोजन पुरवले. चेतन ढवण, बाळासाहेब गोंजारी यांच्यासह अनेक सेवाभावी नागरिकांनीही अन्नदानात सहभाग घेतला. विधाता सामाजिक संस्थेने केळी, बिस्किटे, लाडू आणि भडंग वाटप करून आपले योगदान दिले.

Oplus_16908288

म्हसवड मुस्लिम समाजातर्फे मोठ्या प्रमाणात फळे व पाणी वाटप करण्यात आले


वारकऱ्यांच्या सेवेसाठी नासपचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इंजि. श्री. सुनील पोरे साहेब यांनी पोरे रूग्णवाहिका माऊली फाऊंडेशनच्या सेवेसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. या रूग्णवाहिकेमुळे अनेक वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली आणि संस्थेला देखील सेवा पुरवण्यात मोठी सुलभता आली.

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधाता सामाजिक संस्था म्हसवड, आणि म्हसवड, पुलकोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने औषध वाटप व आरोग्य तपासणी करण्यात आली. म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने आणि परिसरातील डॉक्टर, लॅब टेक्निशियन (माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज, मासाळवाडी) व नर्सिंग स्टाफच्या मदतीने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. हातपाय दुखणे, पायाला फोड येणे, ताप, सर्दी, पोटाचे विकार, रक्तदाब व साखर तपासणी करून औषधे देण्यात आली.

म्हसवड पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवून सर्व वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली. माण तालुका शिवसेनेतर्फे बाळासाहेब मुलाणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी, म्हसवड आणि धुळदेव येथे भोजन व विविध सुविधा पुरवल्या.

म्हसवड नगरपालिकेनेही स्वच्छता, पाणी, शौचालय व्यवस्था अशा सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या. शेवटच्या टप्प्यातील धुळदेव गावाने विशेष योगदान देत भीमराव कोळेकर, दादासाहेब रूपनावर यांच्यासह अनेकांनी अन्नदान केले. अखेर वारीने माण तालुका पार करून सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान केले.

या दोन दिवसांत माण तालुक्यात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचे अनोखे दर्शन घडले. पांडुरंगाच्या ओढीने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे चेहऱ्यावरील भक्तिभाव व समाधान सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *