खचू नका; शासन पाठीशी आहे – पालकमंत्री शंभूराज देसाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड/प्रतिनिधी –
म्हसवड शहरासह माण तालुक्यातील गोंदवले बु, लोधवडे, पिंपरी या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि व्यापार दोन्हींचे प्रचंड नुकसान झाले आहे. या हानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार शंभूराज देसाई सोमवारी बाधित भागात दाखल झाले. उध्वस्त पिकांकडे व्याकुळ नजरेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकल्या आणि त्यांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोबी, कांदा, गहू यासह अनेक पिकांची झालेली हानी पाहताना पालकमंत्र्यांच्या चेहऱ्यावरही वेदना स्पष्ट दिसत होत्या. शेतकऱ्यांनी आपली अडचण, खर्चाचा डोंगर आणि पिकांचे झालेले नुकसान सांगताना वातावरण भावनिक झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी “खचून जाऊ नका, शासन तुमच्या पाठीशी आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी उज्ज्वला गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोणताही बाधित पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरातील अनेक रस्त्यांवर तीन फूटांहून अधिक पाणी साचले होते. यासाठी जबाबदार असलेली अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी स्वतःहून हटवली असून नगरपरिषद प्रशासनाने गटारे स्वच्छ करून पाणी निचऱ्याची व्यवस्था केली आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शहरातील नुकसानीचा आढावा घेतला.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतेच म्हसवड शहरास भेट देऊन प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौरा करून शेतकरी व व्यापाऱ्यांना शासनाच्या मदतीची खात्री दिली. “नुकसानीची भरपाई लांबणीवर पडणार नाही. दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल,” या आश्वासनामुळे बाधितांना मोठा दिलासा मिळाला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *