राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या बांधकाम ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषिरत्न विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड…. प्रतिनिधी
म्हसवड येथील सातारा पंढरपूर मुख्य रस्त्यालगत तात्कालीन वेळी गटार बांधकाम व्यवस्थित न केल्यामुळे नुकतेच अतिवृष्टीत अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाच्या पटीत नुकसान झाले. नुकसानीला जबाबदार असणाऱ्या राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या बांधकाम ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले आहे.
दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2025 रोजीच्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्यामुळे म्हसवड येथील सातारा पंढरपूर रस्त्या लगतच्या शेकडो छोटे व्यवसायिक, व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांच्या पटीत नुकसान झाले. या कोट्यावधी रुपयाच्या नुकसानीला सातारा पंढरपूर रस्ता बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी जबाबदार आहे.
सातारा पंढरपूर रस्त्याचे काम राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ विभागीय कार्यालय पुणे यांचे मार्फत करण्यात आले. या विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय कौन्सिल हॉल पुणे च्या नजीकच आहे. या बांधकाम ठेकेदार कंपनीने याच रस्त्यालगतच्या माण तालुक्यातील पिंगळी, गोंदवले, पिंपरी दिवड इत्यादी ठिकाणी गाव वसाहत उंचीवर असताना सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या आकार स्वरूपात मजबूत गटार बांधकाम केलेले आहे.
मात्र म्हसवड हे नगरपालिकेचे गाव असून सुद्धा तसेच या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराची अत्यंत गरज असतानाही सदर रस्ता बांधकाम ठेकेदार कंपनीने गटारीचे बांधकाम अजिबात केलेले नाही. रस्त्याकडेच्या इतर अनेक छोट्या गावात गटारीचे बांधकाम केले मात्र म्हसवड मध्ये गटार बांधकाम का केले नाही हा संशोधनाचा भाग आहे. का केवळ फक्त कागदो पत्री गटार बांधकाम केले हे तपासणे गरजेचे आहे. सदर गटार बांधकाम नीटपणे केले असते तर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान टळले असते.
याप्रकरणी गटर बांधकाम न करता संगणमताने कागदावर गटर बांधकाम करण्याचा पराक्रम तर या कंपनीने केला नाही ना ? असा संशय व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील इतर गावांना एक न्याय व म्हसवड साठी वेगळा न्याय याचे गुपित शोधणे गरजेचे असून या तोड पाणी प्रकरणात कोणाचे हात ओले झाले ?
म्हसवड येथील सातारा पंढरपूर रस्त्यावरील गटार बांधकाम न केल्यामुळे व्यावसायिकाच्या झालेल्या नुकसानीला रस्ते विकास महामंडळ ची ठेकेदार कंपनी जबाबदारी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.

