म्हसवडमध्ये पावसाने घातलेले थैमान : प्रभाकर देशमुख यांचा पाहणी दौरा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड–प्रतिनिधी
माण -खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतमालाचे उत्पन्न वाहून गेले असून व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माण -खटाव तालुक्यातील नेते व कोकण विभागाचे माजी आयुक्त मा. प्रभाकर देशमुख यांनी शनिवारी म्हसवड शहरासह परिसराचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.
देशमुख यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने अहवाल देऊन शेतकरी व व्यापाऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी केली. “फक्त शेतकरीच नव्हे, तर व्यापारी वर्गालाही या आपत्तीचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे शासनाने सगळ्यांना दिलासा देणारे पॅकेज जाहीर करावे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ सोनवणे, युवक शहराध्यक्ष सचिन माने, परेश होरा, बाळासाहेब माने, संजय पाटील, संजय विरकर, सचिन लोखंडे, चंद्रकांत केवटे, सनी शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हसवड शहरात शिंगणापूर चौक, एसटी स्टँडसमोरील ढाले कॉम्प्लेक्स परिसर तसेच इतर व्यापारी पेठांमध्ये पाणी शिरून मालसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर शहरात दाखल झालेल्या सर्कस ताफ्यातील कलाकारांचीही झोपडपट्टी, साहित्य व प्राण्यांचे खाद्य यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शिवारातील सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांवर अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पिके आडवी होऊन कुजण्याच्या स्थितीत आली असून, शेतकरी हतबल झाले आहेत.
प्रभाकर देशमुख यांनी यावेळी “नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक साहाय्य करावे” अशी ठाम भूमिका मांडली.

