पुळकोटीत वृद्धेचा गळा चिरून खून – गावात भीतीचे वातावरण
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड प्रतिनिधी –
माण तालुक्यातील पुळकोटी गावात शुक्रवार दुपारी घडलेल्या एका भीषण घटनेने परिसर हादरला आहे. गावातील वयोवृद्ध महिला सुलभा मारुती गलंडे (वय ६५) यांचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलभा गलंडे या आपल्या पतीसोबत पुळकोटी येथे वास्तव्यास होत्या. त्यांची दोन्ही मुले पुणे व वडूज येथे स्थायिक आहेत. शुक्रवारी दुपारी पती मारुती गलंडे हे काही कामानिमित्त गावातील सारजाई मंगल कार्यालयात गेले होते. त्यावेळी सुलभा या घरी एकट्याच होत्या.
संध्याकाळच्या सुमारास घरी परतल्यानंतर मारुती गलंडे यांनी आतून बंद असलेला दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ते मागील दरवाज्यातून घरात गेले असता त्यांना सुलभा या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या कपाळावर, गळ्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सपोनी दराडे अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे पुळकोटी गावात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

