खोट्या माहितीच्या २२ कॉलप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल – डायल 112 यंत्रणेचा गैरवापर करून यंत्रणेला फसवले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) –प्रतिनिधी

डायल 112 या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करत खोट्या हल्ल्याच्या तक्रारी केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने तब्बल २२ वेळा डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिली असून, शेवटी पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.

या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री 8.45 ते 11.45 वाजेदरम्यान मौजे शिवाजीनगर, कुकुडवाड (ता. माण) येथील आप्पासो बाबासो भोसले या व्यक्तीने डायल 112 वर फोन करून “माझ्या आईने मला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला असून ती पळून गेली आहे” अशी तक्रार केली होती. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चौकशी केली असता असे कोणतेही प्रकार घडले नसल्याचे निष्पन्न झाले.

फिर्यादी पोलीस कर्मचारी जयराम लहु कवडे (वय 36, पो.काँ. ब. नं. 2685, नेमणूक म्हसवड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पासो भोसले याने यापूर्वीही अशाच स्वरूपाचे खोटे कॉल तब्बल २२ वेळा केले आहेत. त्यामुळे BNS कलम 212 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पो.हवा. भोसले (ब. नं. 1402) हे करत असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्कालीन सेवा ही केवळ खऱ्या गरजूंकरिता आहे, त्यामुळे कोणतीही खोटी माहिती देऊन पोलिसांची वेळ व संसाधन वाया घालवू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *