चार जणांची युवकावर बेदम मारहाण; वैवाहिक वादातून गंभीर हल्ला
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी :प्रतिनिधी
माण तालुक्यातील आंधळी गावच्या हद्दीत असलेल्या नदीवरील पुलावरून जात असलेल्या युवकाला वैवाहिक वादाच्या कारणावरून चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी संबंधित युवकाच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ नारायण ठोंबरे (वय २९, रा. टाकेवाडी, ता. माण) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ही घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ठोंबरे हे टाकेवाडी येथून मलवडीकडे येत असताना आंधळी गावच्या हद्दीतील पुलावर त्यांना अडवून, आरोपी रमेश विठ्ठल कोळपे याने “तू माझी बायको नांदू देत नाहीस” असे म्हणत लाकडी काठीने त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाण केली. यानंतर विशाल कैलास दडस याने दगडाने त्यांच्या डोक्यात घाव घातला. त्याचबरोबर लालासाहेब आनंदराव दडस व गणेश कैलास दडस यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.
या मारहाणीत ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. रात्री ११.५२ वाजता हा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रमेश विठ्ठल कोळपे, विशाल कैलास दडस, लालासाहेब आनंदराव दडस आणि गणेश कैलास दडस (सर्व रा. टाकेवाडी) यांच्याविरुद्ध BNS कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पी. हांगे करत आहेत.

