डिजिटल वीज मीटर विरोधात संतप्त प्रतिक्रिया; महावितरणवर मोर्चा काढण्याचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक : अहमद मुल्ला )
म्हसवड, दि. ६ जून:
म्हसवड शहर व परिसरात महावितरणकडून नागरिकांच्या घरी जबरदस्तीने डिजिटल वीज मीटर बसवण्याची कारवाई सुरू असून, त्यास विरोधाचा जोर वाढत चालला आहे. नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांना निवेदन पाठवून ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांची कोणतीही मागणी नसताना व त्यांच्या परवानगीशिवाय विज ग्राहकांच्या घरी डिजिटल मीटर बसवले जात आहेत. यामुळे विजबिलांमध्ये सरासरी ५ पट वाढ झाल्याचे तक्रारी असून, नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
पोरेंनी असा इशारा दिला आहे की, जर ही जबरदस्तीची प्रक्रिया त्वरित थांबवली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल व कार्यालयाला टाळे ठोकले जाईल. अशा परिस्थितीची वेळ येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही कारवाई बेकायदेशीर असून, लोकशाहीच्या मूल्यांवर घाला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता महावितरण वडूज, शाखा अभियंता म्हसवड व सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हसवड यांना देण्यात आल्या आहेत.
लोकभावनेचा आदर राखून वीज ग्राहकांची मते विचारात घेणे गरजेचे – इंजि. सुनील पोरे