कुलदीप मोहिते (कराड ) पुणे : पुणे जिल्ह्यातील माजी व आजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि सैनिक कल्याणाशी संबंधित विविध संस्था यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ‘सैनिक दरबार’ मंगळवार, दि. 13 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी भूषवणार असून, लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे (उपसंचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे) प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सैनिक दरबाराच्या आयोजनाची मागणी महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष व माजी सैनिक श्री. प्रशांत कदम यांनी दि. 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेऊन केली होती. या बैठकीत सातारा जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात यशस्वीरीत्या राबवलेली सैनिक समस्या निवारण प्रणाली पुणे जिल्ह्यातही राबविण्याची विनंती करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात सैनिक कक्ष स्थापन करण्यात आले होते, तसेच नियमित बैठकांद्वारे माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यात आल्या होत्या.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी पुणे जिल्ह्यातही अशीच रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा प्रारंभ म्हणून 13 मे रोजीचा ‘सैनिक दरबार’ होणार आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व सैनिक संघटनांचे प्रतिनिधी यांना कोट, कॅप व मेडल घालून या दरबारात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सैनिकांच्या प्रश्नांना प्रशासन दरबारातून उत्तर देणार असल्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून, सर्व संबंधितांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. प्रशांत कदम यांनी केले आहे.