दोन सेकंदांच्या व्हिडिओने लावला लुटारूंचा माग! म्हसवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील दोघांना पकडले; सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड | प्रतिनिधी

    म्हसवड परिसरात मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळ महिला तसेच शेतात काम करणाऱ्या महिलांना एकटे गाठून मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, म्हसवड व अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरताव व भाटकी गावांच्या परिसरात रानात मेंढ्या चारणाऱ्या तसेच शेतात काम करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून आरोपी त्यांना एकटे गाठत असत. त्यानंतर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होत होते. या घटनांप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांत महिलांचे एकूण २६ ग्रॅम वजनाचे, सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

   आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असतानाच पोलिसांना आरोपींचे मोबाईलमध्ये चित्रित केलेले अवघ्या दोन सेकंदांचे व्हिडिओ फुटेज मिळाले. या फुटेजच्या आधारे तपासाला दिशा मिळाली; मात्र त्यामध्ये दिसणाऱ्या मोटारसायकलचा क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अधिक कौशल्याने तपासाची चक्रे फिरवली.

        पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी विशेष पथक स्थापन केले. या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत इरफान उर्फ सोन्या नजिर मुलाणी (वय २३) आणि विजय उर्फ भैय्या सतीश जाधव (वय २२, दोघेही रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.

  पोलिसी चौकशीत आरोपींनी महिलांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली. तसेच अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याने या टोळीचे सहा गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून एकूण ३६ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यांत वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईल असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच पोलीस अंमलदार अमर नारनवर, जयराम कवडे, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, संतोष काळे, सतीश जाधव आणि महिला पोलीस अंमलदार मैना हांगे यांच्या पथकाने केली.

महिलांना लक्ष्य करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

म्हसवड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे महिलांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारांना मोठा दणका बसला असून, पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *