शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी : प्रतिनिधी

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बार्शी तालुका पोलिसांनी रात्रभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन आणि ‘ऑल आऊट’ नाकाबंदी मोहीम राबवली. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध गुन्ह्यांमध्ये तब्बल २१ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणारे, अवैध मद्यविक्री करणारे तसेच न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींचा समावेश आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार हॉटेल्स आणि दोन लॉजची तपासणी केली. पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी चार जणांची तपासणी करण्यात आली, तर तीन सराईत गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२(क) अन्वये एक गुन्हा, तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटप्रकरणी चार वॉरंट बजावण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)(W) अन्वयेही कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत १२ प्रकरणे दाखल करून एकूण ८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

हॉटेल रेश्मावर कारवाई; २,३०० रुपयांची दारू जप्त

बार्शी तालुक्यातील हॉटेल रेश्मा येथे पोलिसांनी कारवाई करून २ हजार ३०० रुपये किमतीची दारू जप्त केली. याप्रकरणी अश्विन मधुकर घाडगे (रा. गाताचीवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)(W) अन्वये कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२(क) अन्वये राज सचिन जगताप (वय २१, रा. जामगाव आ.) आणि प्रेम रावसाहेब लोहार (वय २१, रा. धानोरे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी आनंदा बापू पाटील, लक्ष्मण संदिपान लाड, आप्पासाहेब हनुमंत मोरे आणि कौस्तुभ धनराज महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच न्यायालयीन अजामीनपात्र वॉरंटमधील गणेश शिवशंकर गाढवे आणि रावसाहेब उर्फ रावसो पोपट काळे या आरोपींना अटक करण्यात आली

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्यासह पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरूळे, अमृत खेडकर, प्रदीप जगताप, पांडुरंग देशमुख, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, सागर चव्हाण, महमद महेदी, अमृता गुंड, रमेश माने, सागर वाकळे, हनुमंत काळेल, बापूसाहेब लोकरे, ज्ञानेश्वर वाघमोडे, उत्तम चौधरी, बाबासाहेब हांडे आणि निलेश चौधरी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे, फरारी आरोपींचा शोध घेणे आणि न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी करणे या उद्देशाने पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली. या कारवाईमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बार्शी तालुका पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *