वेष बदलून, मोबाईल नंबर बदलून दीड वर्ष पोलिसांना गुंगारा; अखेर डोंगराळ भागातून महिला आरोपी जेरबंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

बार्शी : प्रतिनिधी
चोरीचा गुन्हा करून तब्बल १५ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महिला आरोपीला बार्शी तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून शिताफीने अटक केली.
आरोपीने वारंवार राहण्याचे ठिकाण, मोबाईल क्रमांक आणि वेशभूषा बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तिचा माग काढत शेतकरी व कामगाराचा वेष धारण करून तब्बल दीड दिवस परिसरात पाळत ठेवली आणि योग्य संधी साधून तिला ताब्यात घेतले.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार मिसाळ यांच्या बॅगेतून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित महिला आरोपी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सातत्याने ठिकाणे बदलत होती. तसेच मोबाईल क्रमांक बदलून ती वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होती. नृत्यकलेचे कार्यक्रम करून विविध भागात फिरत असल्याने तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. पोलिसांनी अनेक वेळा तिचा माग काढला; मात्र प्रत्येक वेळी ती पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत होती.

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा परिसरातील डोंगराळ भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, डोंगराळ परिसरातील मोबाईल लोकेशनमुळे आरोपीपर्यंत थेट पोहोचणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.

त्यामुळे पोलिस पथकाने वेगळीच शक्कल लढवत शेतकरी व कामगारांच्या वेशात परिसरात दीड दिवस वावरून आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. योग्य संधी मिळताच पोलिसांनी कारवाई करत महिला आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राणी अरुण साळवे (भिवसने), वय २६ वर्षे, रा. बहुसिंगपुरा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहे. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू असून आरोपीस न्यायालयात पोलीस कोठडी रिमांडसाठी हजर करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे गुन्हा करून कितीही दूर पळाले, वेश कितीही बदलला किंवा मोबाईल क्रमांक कितीही वेळा बदलला, तरी बार्शी तालुका पोलिसांच्या तपास यंत्रणेपासून आरोपींची सुटका नाही, असा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, तसेच अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे आणि सिद्धेश्वर लोंढे यांनी केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *