उंब्रज परिसरात स्मार्ट मीटर बसविण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध; वीज ग्राहकांच्या तक्रारींनी निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज (प्रतिनिधी) :
उंब्रज परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवत महावितरणच्या उंब्रज विभागाला निवेदन सादर केले. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याच्या तसेच बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी वीज ग्राहकांनी मांडत नव्याने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना तालुका प्रमुख कराड उत्तर व दक्षता समिती सदस्य संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता, महावितरण उंब्रज विभाग यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात उंब्रज महावितरणच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांचे वीज बिल पूर्वीपेक्षा दुप्पट-तिप्पट वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून त्याऐवजी पूर्वीचे डिजिटल मीटर बसवावेत. तसेच वाढीव बिलामुळे ग्राहकांनी भरलेली अतिरिक्त रक्कम नियमानुसार परत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वेळेवर वीज बिल भरणे अनेकदा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत प्रीपेड अथवा स्मार्ट मीटर प्रणालीमुळे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचा विचार करून नव्याने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेल्या अनेक वीज ग्राहकांनीही स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले, बिलिंगमधील विसंगती, पूर्वसंमतीशिवाय मीटर बसविणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा आर्थिक त्रास याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
महावितरणने ग्राहकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी उपतालुकाप्रमुख जीवन गायकवाड, संदीप थोरात, संदीप सपकाळ, रामराव घाडगे, योगेश गुजले, शंकरराव घार्गे, शशिकांत पवार, पांडुरंग सावंत, लक्ष्मण गोंजारे, श्रीमंत चव्हाण, लक्ष्मण नाईक, प्रभाकर कमाने, अविराज देशमुख, राजेश शिंदे, महादेव भोंगाळे, सचिन कांबळे, माणिकराव विक्रम अर्जूकडे यांच्यासह शिवसैनिक व मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.

