छकुली’ नावाच्या स्प्लेंडरवर उंब्रज पोलिसांची कारवाई; पालकांसमवेत युवकांचे समुपदेशन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

उंब्रज, प्रतिनिधी :

उंब्रज बसस्थानक व महाविद्यालय परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट प्रवास, वाढदिवसानिमित्त गोंधळ घालणे तसेच विनाकारण दुचाकीच्या फेऱ्या मारून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ‘छकुली’ असे नाव मागील नंबर प्लेटवर लिहिलेल्या स्प्लेंडर दुचाकीवर उंब्रज पोलिसांनी कारवाई करत वाहन ताब्यात घेतले.

या दुचाकीबाबत उंब्रज पोलिसांना वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. महाविद्यालयाच्या मार्गावरील व्यापारी, प्रवासी तसेच नागरिकांनी संबंधित दुचाकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तोंडी तक्रार केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी माहितीची पडताळणी करून संबंधित स्प्लेंडर दुचाकीचा शोध घेत कारवाई केली.

कारवाईदरम्यान संबंधित युवकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत समुपदेशन करून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

उंब्रज पोलिसांच्या या कारवाईचे ग्रामस्थ, महिला प्रवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वागत केले असून सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली आहे.

उंब्रज पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारचे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *