विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकतेचा जागर; तळबीड पोलिसांचे प्रभावी मार्गदर्शन
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
शिरवडे, ता. कराड (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासह सायबर सुरक्षितता, महिला सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी तळबीड पोलीस ठाण्याच्या वतीने ज्योतिर्लिंग हायस्कूल, शिरवडे येथे जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय रविंद्र भोरे, पोलीस अंमलदार शितल मोहिते आणि अमोल फले यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, वाहतूक नियमांचे पालन, बालकांचे कायदेशीर हक्क, पॉक्सो (POCSO) कायदा, बालविवाह, बालमजुरी, व्यसनमुक्ती, महिला व मुलींची सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य वापर करण्याचा, ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचा, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवण्याचा तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. कायद्याचे पालन करणारे, शिस्तप्रिय आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. पोलिसांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करत विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी तळबीड पोलीस ठाण्याचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
यापुढेही विविध शाळांमध्ये अशाच जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थी आणि समाजात कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा मानस असल्याची माहिती प्रभारी अधिकारी एपीआय रविंद्र भोरे यांनी दिली.

