रोटरी क्लब ऑफ उंब्रजचा अभिनव उपक्रम; प्रत्येक कुटुंबाला तैवान पेरूची रोपे व पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते |
उंब्रज /कराड :-प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ उंब्रजने कराड तालुक्यातील शिवाजीनगर येथे ‘पेरूचा गाव’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या उपक्रमाअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला तैवान जातीच्या पेरूच्या रोपांचे वाटप करून लागवड करण्यात आली.
रोटरी परिवर्तन ग्राम म्हणून विकसित होत असलेल्या शिवाजीनगरमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच भविष्यात फळबागांद्वारे ग्रामस्थांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ उंब्रजचे अध्यक्ष रो. विश्वनाथ केंजळे यांनी सांगितले की, रोटरी संस्था पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि साक्षरता अशा विविध क्षेत्रांत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. ‘पेरूचा गाव’ ही संकल्पना त्याचाच एक भाग असून प्रत्येकाने दरवर्षी वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. या रोपांची उत्तम प्रकारे जोपासना करणाऱ्या कुटुंबांचा आगामी काळात रोटरीतर्फे विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला रोटरीचे माजी अध्यक्ष रो. राजीव रावळ, रो. कमलाकर पाटील, रो. विनायक जाधव, उपाध्यक्ष प्रमोद शहा, तसेच गणेश मोरकळ, अभिलेश बेडके, अतुल माने, विकास माने, देवदत्त शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व ग्रामस्थांना रोटरी क्लब ऑफ उंब्रजच्या वतीने पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचेही वाटप करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत ग्रामीण विकासाचा आदर्श ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

