अर्धापूरातील सीसी रस्त्याच्या कामावर नागरिकांचा संताप; चौकशीची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

उद्धव सरोदे

नांदेड (अर्धापूर, प्रतिनिधी ):

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी परिसरात नुकत्याच पूर्ण झालेल्या सीसी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. अंदाजपत्रकातील निकषांचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले सोलिंग (बेस) आणि दर्जेदार गिट्टीचा वापर अपेक्षित असताना प्रत्यक्षात अत्यंत कमी जाडीचा काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आगामी पावसाळ्यात टिकणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यासोबतच शहरातील इतर विकासकामांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, रस्ते, नाली, ड्रेनेज पाइपलाइन यांसह विविध कामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांनी या प्रकारामागे ठेकेदार, संबंधित पदाधिकारी आणि प्रशासनातील काही घटकांच्या संगनमताची शक्यता व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित कामांची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच निकृष्ट दर्जाची कामे पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात विकासकामांच्या गुणवत्तेबाबत चर्चा रंगली असून, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणि दर्जा राखला जावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *