सपोनि दत्तात्रय दराडे यांची अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम आठवड्यातील तिसरी कारवाई; दहिवडीत ३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी :प्रतिनिधी
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम उघडली असून आठवडाभरात करण्यात आलेली ही तिसरी मोठी कारवाई ठरली आहे. सातत्याने सुरू असलेल्या या कारवायांमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी (दि.१८ मे) सायंकाळी दहिवडी-मायणी रोडवरील सिद्धनाथ मंगल कार्यालयासमोर पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी (एमएच ११ सीक्यू १३२२) अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी विविध ब्रँडच्या दारू व बिअरच्या बाटल्या तसेच वाहन असा एकूण ३ लाख १३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पांडुरंग बाळू जाधव (रा. लाडेगाव) व संदीप श्रीकांत कुंदप (रा. पुसेसावळी) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सलग कारवायांमुळे दहिवडी परिसरातील अवैध दारू विक्री व वाहतुकीला मोठा आळा बसत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे कायद्याचा धाक निर्माण होत असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल गणेश खाडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. ए. खाडे करीत आहेत.

