सोहम शिर्के यांच्यावर पुन्हा विश्वास; आपकडून सातारा जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
आम आदमी पार्टी (महाराष्ट्र) यांनी माण-खटाव तालुक्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची सातारा जिल्हा प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वीही त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्याकडे आता दुहेरी जबाबदारी सोपवली आहे.
आम आदमी पार्टी ही पारदर्शकता, प्रामाणिक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी कार्य करणारी पक्ष म्हणून ओळखली जाते. शिक्षण, आरोग्य, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणे हा पक्षाचा प्रमुख अजेंडा असून, महाराष्ट्रात संघटन मजबूत करत जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यावर भर दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे व संघटन अधिक बळकट करणे या उद्देशाने ही जबाबदारी सोहम शिर्के यांच्याकडे देण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रमांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीनंतर सोहम शिर्के यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, “माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन.”
तसेच त्यांनी प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई आणि सातारा जिल्हाध्यक्ष धीरज जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले.
दरम्यान, या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात आम आदमी पार्टीचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून विविध स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

