दिल्लीतील जंतर-मंतर येथे सेवानिवृत्त सैनिकांचे आंदोलन; सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा पाठिंबा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड /उंब्रज :प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सेवानिवृत्त सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांच्या विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाला सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत कदम व महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी दिल्ली येथे उपस्थित राहून आंदोलनात सहभाग नोंदवला.
देशभरातील माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. पूर्व सैनिक एकता यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महारॅलीत विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये माजी सैनिकांवर सिव्हिल समाजाकडून होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सैनिक संरक्षण कायदा लागू करावा, जखमी सैनिकांच्या पेन्शनवर इन्कम टॅक्स लागू करू नये, तसेच अग्निवीर भरती योजना बंद करून नियमित कायमस्वरूपी भरती सुरू करावी व सध्या भरती झालेल्या अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्यात सामावून घ्यावे, या मागण्यांचा समावेश होता.
या आंदोलनात देशातील विविध राज्यांमधून हजारोच्या संख्येने माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह शहीद जवानांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
यावेळी प्रशांत कदम (उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य), सुभेदार (नि.) तुकाराम सूर्यवंशी (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), विजय पाटील (उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), सुभेदार (नि.) दीपक काकडे (सातारा), कॅप्टन (नि.) संपत परीट (कोल्हापूर), अनिल नंदेश्वर (नि. नेव्ही, नागपूर), सुभेदार (नि.) चंद्रासाहेब आदी माजी सैनिक उपस्थित होते.
आंदोलनाच्या शेवटी सैनिकांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणा देत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दर्शवली.

