LPG गॅस तुटवडा व महागाईकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे – सोहम शिर्के
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
देशभरात सध्या एलपीजी (LPG) गॅसचा संभाव्य तुटवडा, वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलताना शिर्के म्हणाले की, गॅस पुरवठा, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता ही सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित बाब आहे. त्यामुळे या संदर्भात निर्माण होणाऱ्या कोणत्याही अडचणींचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत असतो. परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये संभ्रम किंवा भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी शासनाने पारदर्शकपणे माहिती देणे आणि योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाने प्रभावी समन्वय साधण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच माण–खटाव तालुका आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनाही या परिस्थितीमुळे कोणताही नाहक त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शिर्के यांनी सांगितले.
सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने या परिस्थितीवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
“गॅस पुरवठा आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र व महाराष्ट्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. माण–खटाव आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांनाही कोणताही नाहक त्रास होऊ नये.”
— सोहम शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष, सातारा
आम आदमी पार्टी

