उंब्रज नगरपंचायत करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
श्रीकांत जाधव

कराड /उंब्रज – प्रतिनिधी
उंब्रज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले असताना त्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यांनी तात्काळ कार्यवाहीचा शेरा मारल्याने उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवार ॲड. महादेव साळुंखे तसेच इंद्रजित जाधव, अतुल पाटील, सचिन जाधव, सुशांत इनामदार, महेश मानकर, अमित पाटील, बाळासाहेब भोसले, मधुकर जाधव यांनी दरे गावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी उंब्रजला नगरपंचायत का गरजेची आहे, याबद्दलची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

उंब्रज ग्रामपंचायत हद्दीमध्ये ३५ ते ४० हजार लोक रहातात. त्यामुळे ग्रामंपचायतीवर नागरी सुविधांचा ताण आला आहे. घनकचरा प्रकल्प नाही. तारळी नदीकाठ कचरा डेपो झाला आहे. पिण्याचे पाणी दुषित होवून नदीकाठच्या गावांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. बाजारपेठेत सुविधा नाहीत. व्यापारी संकुलाच्या अभावामुळे व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. फायर स्टेशन नाही. अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळण्यास मर्यादा येत आहेत, अशी सर्व परिस्थिती ॲड. महादेव साळुंखे यांनी निवेदनात नमूद केली आहे.

पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील उंब्रज हे विस्तारत चाललेली मध्यवर्ती बाजारपेठ आहे. त्यामुळे उंब्रज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर हाच उंब्रजच्या समस्यांवर उपाय आहे. नगरपंचायतीच्या संदर्भातील प्रस्ताव नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. तो त्वरीत मंजूर झाल्यास सर्व प्रश्न सुटतील, अशी विनंती ॲड. साळुंखे यांनी निवेदनात केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कार्यवाही व्हावी, असा शेरा मारत उंब्रज नगरपंचायतीला हिरवा कंदील दाखवला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *