क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे दातृत्व; अपघातग्रस्त पालकाला विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
सामान्य कुटुंबातील एका विद्यार्थिनीच्या अपघातग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या वतीने मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून जमा केलेल्या निधीतून अपघातग्रस्त निलेश राऊत यांना ३० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालयात नुकतीच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी शिवन्या निलेश राऊत (रा. मार्डी) हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व भावनिक भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. तिच्या प्रभावी भाषणाबद्दल उपस्थित शिक्षक व मान्यवरांनी तिला एकूण ७०० रुपयांचे रोख बक्षीस दिले.
यावेळी शिक्षिका पुनम जाधव यांनी शिवन्याला या बक्षिसाचे काय करणार, असा प्रश्न विचारला असता तिने अत्यंत भावनिक उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचा अपघात झाला असून त्यांचे पुन्हा ऑपरेशन करावे लागणार आहे. त्यामुळे मिळालेली बक्षिसाची रक्कम ती वडिलांच्या उपचारासाठी देणार असल्याचे तिने सांगितले. चिमुकल्या शिवन्याचे हे शब्द ऐकून उपस्थित शिक्षक व मान्यवरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
ही माहिती संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांना देण्यात आली. त्यानंतर संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या परीने मदतीचा निधी जमा केला. या निधीतून ३० हजार रुपयांचा धनादेश संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांच्या हस्ते मार्डी येथे निलेश राऊत यांना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित सर्वांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. शिवन्याच्या संवेदनशीलतेमुळे आणि तिच्या भाषणातून व्यक्त झालेल्या भावनेमुळे हा मदतीचा उपक्रम शक्य झाला.
या कार्याबद्दल मार्डी येथील डॉ. उज्वलकुमार काळे यांनी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. या उपक्रमात प्राचार्य विठ्ठल लवटे, प्राचार्य विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल माने यांचे सहकार्य लाभले.
मार्डी येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, पूनम कोकणी, पूनम जाधव, अलिशा मुल्ला, सचिन बाबर, महावीर झिमल, सुहास भिवरे, संकुलातील विद्यार्थी प्रतिनिधी, शिवन्या राऊतचे कुटुंबीय तसेच मार्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने विद्यार्थिनीच्या अपघातग्रस्त वडिलांना केलेल्या या मदतीमुळे समाजात संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे.

