कटकारस्थानातून डॉक्टरांना गोवण्याचा प्रयत्न, सत्याचा विजय होईल – डॉ. रेखा दोलताडे
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :-प्रतिनिधी
म्हसवड येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. बाबासो दोलताडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा हा पूर्णतः बनावट व सूडबुद्धीने रचलेला कट असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी डॉ. रेखा दोलताडे यांनी केला आहे. म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणामागील संपूर्ण पार्श्वभूमी सविस्तरपणे उघड केली.
डॉ. रेखा दोलताडे म्हणाल्या की, “डॉ. बाबासो दोलताडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून म्हसवड व पंचक्रोशीतील हजारो रुग्णांची सेवा केली आहे. गरीब, गरजू आणि आपत्कालीन रुग्णांसाठी आमचे ‘दोलताडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’ हे नेहमीच आधाराचे ठिकाण राहिले आहे. अशा डॉक्टरांवर खोटा आणि घृणास्पद गुन्हा दाखल होणे हे अत्यंत वेदनादायक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात पूर्वी राखुंडे नावाचे पती-पत्नी कार्यरत होते. या दोघांकडे रुग्णालयाचा संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि हिशोब सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्यावर डॉक्टरांचा पूर्ण विश्वास होता. मात्र, कालांतराने या दांपत्याने रुग्णालयाच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचे निदर्शनास आले.
“हा प्रकार लक्षात येताच आम्ही कोणताही दबाव न घेता कायदेशीर मार्ग स्वीकारला. दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात संबंधित दांपत्याविरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही,” असा आरोपही डॉ. रेखा दोलताडे यांनी केला.
तक्रार मागे घ्यावी यासाठी संबंधित दांपत्याने शहरातील काही समाजकंटकांना हाताशी धरून धमक्या देण्यास सुरुवात केली. “आम्ही तक्रार मागे घेतली नाही, म्हणूनच आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची उघड धमकी देण्यात येत होती. अखेर या सर्वांनी संगनमत करून पूर्वनियोजित कट रचत डॉक्टरांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात आपला न्यायव्यवस्थेवर अढळ विश्वास असल्याचे सांगत डॉ. रेखा दोलताडे म्हणाल्या, “न्यायदेवता अंध नाही. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न झाला तरी ते बाहेर येतेच. या प्रकरणातही दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच स्पष्ट होईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की डॉ. बाबासो दोलताडे निर्दोष सिद्ध होतील.”
शेवटी त्यांनी प्रशासन व तपास यंत्रणेकडे निष्पक्ष, सखोल आणि तटस्थ चौकशीची मागणी करत, सत्त्याचाच विजय होईल अशी आशा व्यक्त केली

