दहिवडीत मध्यरात्री घरफोडी; मोबाईल शॉपी व बँक ऑफ बडोदा सीएससी मधून 2 लाखांहून अधिक रक्कम लंपास
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी:-प्रतिनिधी
माण तालुक्यातील दहिवडी शहरात मध्यरात्री झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मायणी चौकातील ओमी मोबाईल शॉपी आणि बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र (मनी ट्रान्सफर) या एकाच परिसरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने शटर उचकटून तब्बल ₹2,06,100 रुपयांची रोकड लंपास केली.
फिर्यादी मनोज बाळकृष्ण म्हेत्रस (वय 39, रा. दहिवडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबरच्या रात्री 9.30 ते 5 डिसेंबर सकाळी 9.15 या दरम्यान ही घटना घडली. चोरट्याने दुकानाचे शटर तोडून थेट ग्राहक सेवा केंद्रातील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गु. र. नं. 491/2025, BNS 305(a), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अज्ञात आहे.
घटना समजताच डीवायएसपी रणजित सावंत यांनी रात्री 8.45 नंतर घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पुढील तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता पसरली असून पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फूटेजचा मागोवा घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

