श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाहाची लगीनघाई ‘श्रीं’च्या विवाहसोहळ्यासाठी रुखवत

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सचिन मंगरुळे
म्हसवड प्रतिनिधी

येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्याची लगीनघाई सुरु झाली असून श्रींच्या शाही लग्नाचा रुखवंत वाजतगाजत मंदीरात नेहण्यात आला.

          दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीयांच्या संपूर्ण एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु आहे. दिवाळी पाडवा ते तुलसी विवाह या १२ दिवसाच्या दरम्यान नवरात्राचे उपवास शहरातील नागरीक करीत असतात.

        तुलसी विवाहादिवशी श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याची मंदीरात लगबग सुरु असून या विवाह सोहळ्यासाठी रुखवंताचा मान पिढ्‌यां पिढ्यांपासून येथील सुरेश रामचंद्र माने पाटील यांना असून लग्नाच्या आधी दोन दिवस हा रुखवत मंदिरात वाजतगाजत नेहण्यात आला. या रुखवंता मध्ये सुमारे १५ वेगवेगळे पदार्थ, देवाला व श्री सिद्धनाथ सालकरी यांना संपूर्ण पोशाख, हार, मंडवळ्या यांचा समावेश असतो.

     म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कार्तिक शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु. प्रतिपदा तब्बल एक महिना श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा संपन्न होतो.

      माने पाटील यांच्या घरापासून शहरातील मुख्य पेठेतून वाजतगाजत माने पाटील कुटूंबातील सुवासिनी आणि अनेक महिला श्री सिद्धनाथ मंदीरात घेऊन जातात. त्यानंतर मंदीरात सालकरी यांचेकडे सुपूर्द करण्यात येतो व मंदीरातील गाभाऱ्यात श्रींच्या मूर्ती समोर ठेवण्यात येतो.

      आज रविवार २ नोव्हेंबर रोजी (तुलसी विवाह) पहाटे साडेपाच वाजता घट उठविले जाणार असून, नवरात्र समाप्ती होणार असून बारा दिवसाचे उपवास सोडले जाणार आहेत. त्याच रात्री १२ वाजता श्रींचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. विवाहानंतरची वरात म्हणजेच येथील रथयात्रा होय. ही रथयात्रा मार्गशीर्ष शु. प्रतिपदा रोजी असते. चालू वर्षी रथयात्रा शुक्रवार दि २१ नोव्हेंबर रोजी आहे.

         या दिवशी होणाऱ्या रथयात्रेने म्हणजेच, विवाहा नंतरच्या वरातीने, श्रींच्या या एक महिना चालणाऱ्या शाही विवाह सोहळ्याची सांगता होत असते. श्रींच्या या शाही विवाहसोहळ्याच्या निमित्ताने येथील मंदिराची आतील गाभाऱ्यापासून बाहेरील हत्तीमंडपा पर्यंतच्या संपूर्ण भागाची धूऊन, घासून, पुसून स्वच्छता, रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, मंदिराच्या शिखरावरील व नवीन बांधकामावरील आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांची सालकरी, पुजारी, मानकरी, सेवेकरी आणि भाविकांची मोठी लगबग अर्थात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *