खाजगी शिक्षण संस्था सरकारी ताब्यात घेऊन सर्वांना मोफत शिक्षण द्या; पत्रकारांना ₹३० हजार पेन्शनचीही मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
कराड | प्रतिनिधी
कराड येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य शिवराष्ट्र युवक संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार (भाऊ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शिक्षण, बेरोजगारी, ठेवीदारांचे प्रश्न, आरोग्य व्यवस्था, महिला सक्षमीकरण, पत्रकारांचे संरक्षण आदी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
बैठकीत राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्था सरकारी ताब्यात घेऊन त्या सरकारी शाळा, महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये विलीन कराव्यात तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. वाढत्या शुल्क व डोनेशनमुळे गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अशक्य होत असल्याने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई पदांची भरती तातडीने करावी, अशी मागणीही संघटनेने केली. बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच महिलांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन स्वावलंबी बनविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत बंद पडलेल्या सहकारी पतसंस्था व बँकांमधील ठेवीदारांचा मुद्दाही जोरदारपणे मांडण्यात आला. संचालक मंडळाच्या मालमत्ता विकून ठेवीदारांना व्याजासह पैसे परत मिळावेत, यासाठी सहकार खात्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
खाजगी रुग्णालयांमधील वाढत्या उपचार खर्चावरही संघटनेने टीका केली. अनावश्यक शस्त्रक्रिया, महागडी औषधे आणि रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी डॉक्टरांच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार व गुंतवणुकींची आयकर विभाग आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मेडिकलमधील औषधांची किंमत, उपयोग, गुणवत्ता व एक्सपायरीची माहिती फलकावर अनिवार्यपणे प्रदर्शित करण्याची मागणीही करण्यात आली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या योजना व अनुदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. संघटनेची सदस्य नोंदणी राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुरू असून “गाव तिथे शाखा” हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध करण्यात आला. त्याचवेळी महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन शांततापूर्ण आंदोलनांना सहकार्य करत असल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
याशिवाय पत्रकार आणि टीव्ही चॅनेल प्रतिनिधींना विशेष संरक्षण, पोलीस सुरक्षा, रेल्वे-एसटी-विमान प्रवासासाठी मोफत पास तसेच दरमहा ₹३० हजार पेन्शन सुरू करण्याची मागणी संघटनेने शासनाकडे केली.
बैठकीस प्रदेशाध्यक्ष स्वरूप निकम, प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव सोनटळे, सरचिटणीस शोभाताई सुतार, दीपाली शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा विजया माने, जिल्हाध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस माधुरी बावधने, कराड तालुकाध्यक्ष मंजुनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजया माने यांनी सूत्रसंचालन तर नितीन जाधव यांनी आभार मानले.

