संरक्षण सेवेला प्राधान्य द्या; तीच खरी देशसेवा – विलास इंदलकर
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
“आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी संरक्षण सेवेला प्राधान्य द्यावे. संरक्षण सेवा हीच खरी देशसेवा असून त्यासाठी आवश्यक तयारी शालेय जीवनापासूनच सुरू केली पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याच्या जीएसटी विभागाचे माजी अप्पर आयुक्त विलास इंदलकर यांनी केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवड येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, हर्षदा बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन, शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना इंदलकर म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सीबीएसई शिक्षण पद्धतीचा मजबूत पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. नीट, यूपीएससी, एमपीएससी तसेच विविध केंद्रीय स्पर्धा परीक्षांसाठी सीबीएसई अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भक्कम आधार देतो. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडल्यास सक्षम राष्ट्राची निर्मिती आपोआप होते, त्यासाठी शिक्षक आणि पालक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प शुल्कात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य क्रांतिवीर सीबीएसई विद्यालयामार्फत होत असल्याचे सांगून त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या समर्पित कार्यामुळे गुणसंपन्न युवा पिढी घडत असून संस्थेवरील पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचा नावलौकिक सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी त्यांनी यूपीएससी, एमपीएससी, विविध केंद्रीय स्पर्धा परीक्षा तसेच संरक्षण दलातील करिअरच्या संधी, अभ्यासाचे नियोजन, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यशासाठी नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि ध्येयाशी प्रामाणिक राहण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला. कार्यक्रमानंतर त्यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेच्या प्रगतीचा आढावा कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी मांडला. सूत्रसंचालन पल्लवी जगताप यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी मानले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

