कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना म्हसवड पोलिसांचा दणका!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

म्हसवड | प्रतिनिधी

मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात म्हसवड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत ८ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५६ वाहनचालकांवर कारवाई करून २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

म्हसवड परिसरात काही मोटारसायकलस्वार सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी वाहतूक अंमलदारांचे विशेष पथक तयार करून कारवाईची मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मोटारसायकलींचे ८ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच दणका बसला आहे.

मोटारसायकलमध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हसवड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच पोलीस अंमलदार पोपट चव्हाण, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात आणि युवराज खाडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *