४४ अंश तापमानात माण-खटाव पेटला! हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; आंदोलनानंतर रक्तदान करून प्रशासनाला दिला इशारा
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, ता. माण :
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई, पाणी वाटपातील कथित अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या भूमिकेविरोधात आज म्हसवड येथे शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तब्बल ४३ ते ४४ अंश तापमानातही शेकडो शेतकरी, महिला आणि युवक रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण तालुक्यात आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली.
सिद्धनाथ रथगृह येथून सुरू झालेला मोर्चा सिद्धनाथ मंदिर, मुख्य बाजारपेठ, सरकारी दवाखाना आणि एस.टी. स्टँड मार्गे मा. अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी मा. अप्पर तहसीलदार सौ. मीनाबाबर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले, “देशात चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्टॅम्प घोटाळा झाले; आता माण-खटावमध्ये पाणी घोटाळा सुरू आहे. काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जातात, मात्र माण तालुक्याच्या पूर्व भागाला एकही आवर्तन मिळत नाही. हा उघड अन्याय आहे.”
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “कायद्यासमोर सर्व समान असताना आमच्यावर दुजाभाव का केला जातो? हक्काचे पाणी आम्हाला का नाकारले जाते?”
करचे यांनी ‘जिहे-कटापूर’ योजनेचाही मुद्दा उपस्थित करत सांगितले की, “निवडणुकीच्या काळात पाणी सोडले जाते आणि निवडणूक संपताच बंद केले जाते. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.”
तसेच तारळी योजनेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर संगनमताचा संशय व्यक्त केला. “वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. मग या पाणी चोरीला संरक्षण कोणाचे?” असा थेट सवाल त्यांनी केला.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
पाणी घोटाळा व पाणी चोरी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
माण-खटाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटप तात्काळ सुरू करावे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
नुकसानभरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी.
आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी महेश करचे म्हणाले, “शेतकऱ्यांची पोरं देशाच्या सीमेवर रक्त सांडत आहेत आणि शेतकरी घाम गाळून देश जगवत आहे. भले आमचे रक्त घ्या, पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या.”
“पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा देत त्यांनी पुढे सांगितले की, “न्यायासाठी प्रसंगी न्यायालयाची पायरी चढू; पण हा लढा थांबणार नाही.”
मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तीव्र उष्णतेतही महिलांनी दाखवलेला निर्धार चर्चेचा विषय ठरला. या आंदोलनामुळे माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

