काळचौंडी घाटात तरुणावर प्राणघातक हल्ला — सहा जणांना अटक, न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कस्टडी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण) दि. 2 :
काळचौंडी ते झरे जाणाऱ्या रस्त्यावर काळचौंडी घाटाच्या खाली सहा जणांनी एकत्र येत तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
फिर्यादी साजन अरुण चव्हाण (वय 24, रा. काळचौंडी, ता. माण, जि. सातारा) हे 1 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता मामाच्या मोटारसायकलवरून जांभुळणी येथील भोजलिंग मंदिराकडे जात असताना काळचौंडी घाटाच्या खाली ही घटना घडली.
गावातीलच ओळखीचे सुरेश नामदेव सावंत, कैलास लक्ष्मण माने, साहिल कैलास माने, प्रतिक कैलास माने, सत्यवान सुभाष माने आणि भाऊसाहेब विठोबा माने यांनी इर्टिगा कार आडवी मारून फिर्यादीचा मार्ग अडवला. त्यानंतर सुरेश सावंत याने लोखंडी रॉडने, कैलास माने याने काठीने, प्रतिक माने याने दगडाने तर साहिल व सत्यवान माने यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाऊसाहेब माने याने “ह्याला मारा” असे म्हणत उत्तेजन दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून म्हसवड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध BNS 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 189(1)(2), 191(2)(3), 190, 126(2) कलमान्वये गुन्हा क्रमांक 317/2025 दाखल केला.
सदर आरोपींना अटक करून आज माननीय न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केले असता न्यायालयाने सर्वांना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जे.डी. लुबाळ (मो. 9870091761) करीत आहेत.

