उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उंब्रजमध्ये ४० दिव्यांगांना मोफत मॉड्युलर पाय व कॅलिपर्स वाटप
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक : अहमद मुल्ला )
उंब्रज, ता. ३ मे (प्रतिनिधी: कुलदीप मोहिते) –
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वर्ष “एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” म्हणून साजरे केले जात आहे. याच उपक्रमाअंतर्गत मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी श्रीकांत शिंदे फौंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्री शिव योद्धा प्रतिष्ठान, उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने ४० दिव्यांग बांधवांना मोफत मॉड्युलर हात, पाय आणि कॅलिपर्सचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात २४ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरातून झाली होती. या शिबिरात रक्तदान, मोफत मोतिबिंदू निदान व शस्त्रक्रिया, तसेच चष्मे वाटप करण्यात आले होते. त्याचवेळी ४० दिव्यांगांचे मॉड्युलर पाय व कॅलिपर्ससाठी माप घेण्यात आले होते.
उंब्रज ग्रामपंचायतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये आयोजित वितरण कार्यक्रमात अनेक दिव्यांगांनी कुबड्या वा वॉकरच्या सहाय्याशिवाय चालण्याचा आनंद अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हा क्षण पाहून श्री शिव योद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीचे समाधान लाभले.
कार्यक्रमास स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना नवसंजीवनी लाभल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
यापुढील अशाच सामाजिक कार्यात श्री शिव योद्धा प्रतिष्ठान योगदान देत राहील, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.