शासन आपल्या दारी कार्यक्रमातून”शासकीय काम आणि सहा महिने थांब” हि प्रचलित परंपरा मोडीत काढण्याचा आमचा उद्देश – मंत्री आदिती तटकरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
म्हसळा – सुशील यादव
शासकीय काम आणि सहा महिने थांब अशी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनातील भुमिकेत बदल करायचे उद्देशाने पडलेली प्रचलित परंपरा कायम मोडीत काढण्याचा आमचा उद्देश आहे.राज्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारचे विविध योजनांचा लाभ तत्काळ घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन शासन आपल्या दारी कार्यक्रम जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजीत करण्यात येत असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगीतले.
मागील महिन्यांत गोरेगाव लोणेरे येथे रायगड जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री,खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.त्याच अनुषंगाने तालुका स्तरावरील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दुपटीने देता यावा यासाठी श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगताना श्रीवर्धन तालुक्यात ३००० हजार,तळा तालुक्यात १५०० आणि म्हसळा तालुक्यात एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून दिले.


