ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तळबीड पोलिसांचा पुढाकार; भरोसा सेलच्या माध्यमातून साधला संवाद!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

श्रीकांत जाधव | तळबीड:-प्रतिनिधी 

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तळबीड पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथील भरोसा सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. तळबीड पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आजच्या डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी व्यक्तींकडून होणारी फसवणूक अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, ओटीपी, एटीएम पिन अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये. ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आल्या.

याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी घाबरून न जाता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. आपल्या समस्या पोलिसांना निःसंकोचपणे सांगाव्यात. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

पोलीस प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात संवाद, समन्वय व विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, त्यांच्या अडचणी वेळेत समजाव्यात आणि त्यांना सुरक्षिततेची भावना मिळावी, हा या बैठकीमागील महत्त्वाचा उद्देश होता. तळबीड पोलीस ठाणे व भरोसा सेलच्या या उपक्रमाचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले.

या बैठकीस तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक खराडे, भरोसा सेल शाखेतील पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथील डी. पी. गुरव (महिला पोलीस हवालदार), एस. एस. पवार, पी. एन. देशमुख व टी. आर. शिंदे (महिला पोलीस कॉन्स्टेबल), तळबीड पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस हवालदार उत्तम कोळी, गणेश बाकले, तसेच पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षितता आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण यासाठी पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकी जपणारा ठरत आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *