पाटण तालुक्यात ‘बी.एन.एच.एस. निसर्ग मंडळा’चा पर्यावरण जागृतीचा जागर!
व्हिजन २४ तास न्यूज
पाटण प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जिज्ञासा निर्माण करून पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) ‘बी.एन.एच.एस. निसर्ग मंडळा’तर्फे पाटण तालुक्यात विशेष पर्यावरण शिक्षण मोहीम राबविण्यात आली. ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान सहा दिवसांत तालुक्यातील १४ शाळा व शैक्षणिक संस्थांना भेटी देत विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण, जैवविविधता संवर्धन आणि निसर्ग पर्यटनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

बी.एन.एच.एस.चे संचालक किशोर रिठे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बी.एन.एच.एस.चे प्रकल्प सहयोगी रोहन चव्हाण यांनी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणविषयक मार्गदर्शन केले. या मोहिमेला क्रिएटिव्ह नेचर फ्रेंड्स, कराड आणि कोयना पर्यावरण जागृती मोहीम, पाटण यांचे सहकार्य लाभले. कोयना एज्युकेशन सोसायटीनेही या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
पक्षी निरीक्षणातून निसर्गाची ओळख
विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीची ओळख व्हावी, यासाठी स्थानिक पक्ष्यांचे रंगरूप, अधिवास, वर्तन आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरातील झाडे, पक्षी, फुलपाखरे आणि इतर सजीवांची निरीक्षणे नोंदविण्यासाठी ‘शालेय जैवविविधता नोंदवही’ (School Biodiversity Register) तयार करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

निसर्ग पर्यटनाविषयी मार्गदर्शन करताना स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक पर्यटनातून उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नोत्तरे आणि सहभागी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग समजून घेण्याची संधी देण्यात आली.
या मोहिमेत कोयना पर्यावरण जागृती मोहिमेचे समन्वयक प्रा. सतीश गायकवाड आणि सहायक समन्वयक प्रा. भावना जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.
ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शाळांचा सहभाग
या मोहिमेत कै. दादासाहेब पाटणकर विद्यालय, म्हावशी; मोरणा विद्यालय, मोरगिरी; इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पाटण; सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा, पाटण; नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोयनानगर; गुरुवर्य लालासाहेब पाटणकर हायस्कूल, भोपोळी; श्री क्षेत्रपाल विद्यालय, अडुळ; न्यू इंग्लिश स्कूल, विहे; श्री छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धोरोशी; परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय, कळंबे; माने-देशमुख विद्यालय आणि बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण यांसह विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग होता.
बाळासाहेब देसाई महाविद्यालयात समारोप
१० ऑक्टोबर रोजी कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयात या मोहिमेचा समारोप झाला. यावेळी कोयना पर्यावरण जागृती मोहीम आणि बी.एन.एच.एस. निसर्ग मंडळाचे समन्वयक प्रा. सतीश गायकवाड यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने रोहन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या आयोजनात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जैवविविधतेविषयी जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला.

