नातेपुतेच्या भूमीत नवनाथ भिसेंचा क्रीडा क्षेत्रात गौरव; ‘क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ने सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
विशाल माने 
गोंदवले :प्रतिनिधी 
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नवनाथ बाळू भिसे यांच्या कार्याचा नातेपुते येथे विशेष सन्मान करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकॅडमी, नातेपुते यांच्या वतीने देण्यात येणारा ‘क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ त्यांना प्रदान करण्यात आला.
नातेपुते येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. भिसे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मार्शल आर्ट्स तसेच क्रीडा क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण योगदान, क्रीडाविषयक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. या विचारातून क्रीडा क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स अकॅडमीकडून दरवर्षी विविध पुरस्कार देण्यात येतात. याच उपक्रमातून यंदाचा ‘क्रीडारत्न’ सन्मान नवनाथ भिसे यांच्या कार्याला मिळाला आहे.
पुरस्कार स्वीकारताना भिसे यांनी हा सन्मान आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अशा पुरस्कारांमुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवनाथ भिसे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ‘क्रीडारत्न’ पुरस्कारामुळे भिसे यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याला मानाची नवी पावती मिळाली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *