वयाच्या ६६ व्या वर्षी प्रदीप पोरे (आबा) यांची विटा–पंढरपूर सायकल वारी पूर्ण; तरुणांसमोर ठेवला प्रेरणादायी आदर्श
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड / प्रतिनिधी :
जिद्द, चिकाटी आणि वारकरी परंपरेवरील नितांत श्रद्धेच्या बळावर नासप (नामदेव समाजोन्नती परिषद) सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप पोरे (आबा), रा. कराड यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी विटा ते पंढरपूर सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण करून तरुण पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
वाढत्या वयातही नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सायकल वारी पूर्ण करत वारकरी परंपरेबरोबरच निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत असून समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नामदेव समाजोन्नती परिषद, सातारा जिल्हा यांच्या वतीने प्रदीप पोरे (आबा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी सांगितले की, “वय हा केवळ आकडा असतो. दृढ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे प्रदीप पोरे (आबा) यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी.”
परिषदेचे सरचिटणीस श्रीकांत फुटाणे यांनीही प्रदीप पोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व धार्मिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नामदेव समाजोन्नती परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी त्यांच्या या यशस्वी सायकल वारीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रदीप पोरे (आबा) यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून वारकरी परंपरा, आरोग्यदायी जीवनशैली आणि समाजासाठी प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.

