नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
गणेश तळेकर
मुंबई :प्रतिनिधी 
       मराठी रंगभूमीवर सध्या नव्या विचारांचे, समकालीन विषयांचे आणि तरुण ऊर्जेचे वारे वाहताना दिसत आहेत. पारंपरिक चौकटींपलीकडे जात नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध आणि आजच्या तरुणाईच्या भावविश्वावर आधारित प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. अशाच नव्या दमाच्या कलाकारांना व्यासपीठ देणारे ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

         ‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक Sachin Pilgaonkar उपस्थित होते. नव्या कलाकारांच्या आगमनामुळे रंगभूमीला नवी ऊर्जा मिळेल आणि मराठी नाट्यव्यवसायासाठी ते सकारात्मक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

      निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर यांनी नवोदित कलाकारांना संधी देण्याच्या उद्देशाने हे नाटक साकारले आहे. ‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’ अशी आकर्षक टॅगलाईन असलेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, १५ मे रोजी दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे.

     आजच्या तरुण पिढीचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन, बदलती सामाजिक मानसिकता आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम यावर उपरोधिक आणि भावनिक भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना हास्यसोबत विचार करायलाही भाग पाडणार आहे. नातेसंबंध, प्रतिष्ठा आणि वास्तव यांची विनोदी कसरत या नाटकातून अनुभवायला मिळणार आहे.

     निर्माते राहुल भंडारे म्हणाले, “आजच्या तरुणाईचे विचार आणि बदलती कौटुंबिक समीकरणे हलक्याफुलक्या शैलीत मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना संधी देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

         दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनी सांगितले की, “विनोदाच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना स्वतःशी जोडून घेण्यास भाग पाडेल.”

      या नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. नाटकाचे लेखन आणि संगीत चैतन्य कुलकर्णी यांचे असून दिग्दर्शन श्रेयस इंदापूरकर यांनी केले आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, तर नृत्यदिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. तसेच Avadhoot Gupte, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजातील गाण्यांनी नाटकाला विशेष रंग चढवला आहे.

   शुभारंभानंतरचे पुढील प्रयोग शनिवार १६ मे रोजी रात्री ८.३० वा. आचार्यअत्रे नाट्यगृह , रविवार १७ मे रोजी दुपारी १२ वा.विष्णुदास भावे नाट्यगृह , मंगळवार १९ मे रोजी दुपारी ४ वा. शिवाजी मंदिर आणि रविवार ३१ मे रोजी दुपारी ४ वा. यशवंत नात्यागृह येथे होणार आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *