उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: ‘उष्माघात’ टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!:-डॉ. जे. टी. पोळ
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड 😐 प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून ‘उष्माघात’ (Heat Stroke) सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका वाढला आहे. याबाबत नागरिकांनी वेळीच काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन डॉ. जे. टी. पोळ (फिजीशियन व हृदयरोग तज्ज्ञ, निकोप हॉस्पिटल, फलटण) यांनी केले आहे.
डॉ. पोळ यांनी सांगितले की, शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास मेंदू, हृदय व मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊ शकतो. भारतात दरवर्षी उष्माघातामुळे शेकडो मृत्यू होत असून, २०२५ मध्येही अनेकांनी जीव गमावला आहे. महाराष्ट्रातही ही समस्या अधिक गंभीर बनत चालली असून सातारा जिल्हा व फलटण परिसरात तापमान ४० अंशांच्या पुढे जात आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखा उच्च तापमान, घाम येणे थांबणे, त्वचा कोरडी व गरम होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर, उलट्या, हृदयाचे ठोके वाढणे तसेच मानसिक गोंधळ किंवा शुद्ध हरपणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत.
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय नागरिकांनी दिवसातून पुरेसे पाणी पिणे, ताक, लिंबू सरबत, शहाळे पाणी व ओआरएसचा वापर करणे गरजेचे आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा तसेच सैल व सुती कपडे परिधान करावेत. आहारात काकडी, टरबूज यांसारख्या पाणीयुक्त फळांचा समावेश करावा.
उष्माघात झाल्यास त्वरित उपचार आवश्यक रुग्णाला सावलीत किंवा थंड जागी नेऊन कपडे सैल करावेत, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात व शुद्धीत असल्यास पाणी द्यावे. मात्र ही गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्याने वेळ न दवडता रुग्णाला तात्काळ निकोप हॉस्पिटल येथे किंवा जवळच्या सुसज्ज रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
डॉ. पोळ यांनी विशेषतः हृदयरोगी व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे सांगितले असून, “सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
— आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी सजग राहा!

