धुळदेव परिसरातील अपघातप्रकरणी पत्रकारांचे अमरण उपोषण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड,  (प्रतिनिधी):
सातारा–पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी स्थानिक पत्रकारांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

आज सकाळी धुळदेव परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या मार्गावरील म्हसवड-आण नदी पूल, दिवड-करंज ओढा पूल, धुळदेव ओढा पूल आदी कामे गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित विभाग, ठेकेदार आणि प्रशासन यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत ३० हून अधिक नागरिकांचा बळी गेला असल्याने या घटना केवळ अपघात नसून गंभीर निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचे स्पष्ट होते.

यासंदर्भात पत्रकारांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

संबंधित ठेकेदार व बांधकाम कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी

अपूर्ण रस्ते व पुलांची कामे तात्काळ पूर्ण करावीत

भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात

दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १ एप्रिल २०२६ रोजी म्हसवड पोलीस स्टेशनसमोर पत्रकार अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर सल्लाउद्दिन चोपदार (दै. सकाळ), पोपट बनसोडे (दै. पुढारी), सचिन शिंगाडे (माणदेश प्राईम), शहाजी लोखंडे (दै. बाळकडू) अहमद मुल्ला (दै. लोकमंथन)एल के सरतापे यांच्या सह्या आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *