प्रत्येक झेडपी गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना ठाम आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड | प्रतिनिधी :
माण-खटाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला किमान २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणी कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेली निधी योजना सातारा जिल्ह्यातही तातडीने राबवावी, असे स्पष्ट करत त्यांनी विकासाबाबत भेदभाव न करण्याची भूमिका मांडली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील राजकीय आणि विकासात्मक दिशा स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे व बाळराजे विरकर उपस्थित होते.

करचे म्हणाले, “कुकुडवाड गटाची निवडणूक जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय ठरली. पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याच्या चर्चा झाल्या, तरीही जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आता मतभेद विसरून सर्वांनी मिळून विकासासाठी काम करणे गरजेचे आहे.”

निवडणुकीत विजयी झालेले अनिल देसाई व पराभूत अरुण गोरे यांनीही विकासाची भूमिका घेतल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र विकासासाठी ठोस नियोजन, स्पष्ट कालमर्यादा आणि पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“गटातील पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. गरज भासल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

सोलापूर जिल्ह्यातील प्रचारादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिल्याची आठवण करून देत, “माण-खटाव तालुक्यात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्व गटांना समान निधी देऊन विकासाची गती वाढवावी,” अशी मागणी त्यांनी केली.

तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समान निधी वाटप हीच काळाची गरज असल्याचा ठाम संदेश करचे यांनी यावेळी दिला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *