सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसरी वाघीण निसर्ग मुक्त कोयना अभयारण्यात वाढणार वाघांची संख्या; पर्यटन व जैवविविधतेला चालना
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते | कराड प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बातमी समोर आली असून, प्रकल्पात तिसरी वाघीण यशस्वीपणे निसर्गमुक्त करण्यात आली आहे. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी ‘STR-06’ या क्रमांकाची वाघीण कोयना अभयारण्याच्या कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली.
ही वाघीण पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पकडण्यात आली. त्यानंतर विशेष सुरक्षा व्यवस्थेत तिची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाहतूक करण्यात आली. बोटीमार्गे प्रवास करून तिला शुक्रवारी रात्री कोयना अभयारण्यात आणण्यात आले.
आगमनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी व मटन देण्यात आले असून ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. शनिवार सकाळी ६ वाजता तिला कोअर क्षेत्रात सोडण्यात आले.
कोयना अभयारण्यात आधीपासून असलेला नर वाघ ‘STR-03 – बाजी’ याच्या जोडीला आता ही नवीन वाघीण दाखल झाल्याने प्रजननास चालना मिळणार असून पर्यटन व वन्यजीव संवर्धनासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पसरलेला ११६५ चौ. कि.मी. परिसर असलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध असून अनेक दुर्मिळ प्रजातींचे हे सुरक्षित अधिवास आहे. या वाघीणीच्या आगमनामुळे पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी आकर्षण वाढणार आहे.
वन विभागाचे यशस्वी ऑपरेशन
हे संपूर्ण ऑपरेशन क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना), विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर (कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे तसेच वनपाल व वनरक्षक यांनी यशस्वीपणे पार पाडले.
▪️ चौकट
पेंचमध्ये ‘PTR-123’, सह्याद्रीत ‘STR-06’
पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघीणीचा क्रमांक PTR-123 होता. सह्याद्रीत आल्यानंतर तिला STR-06 हा अधिकृत क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक गाईड मंडळींनी प्रेमाने तिचे नाव ‘हिरकणी’ असे ठेवले आहे.
ही घटना सह्याद्रीच्या वनसंपदेतील आणखी एक मैलाचा दगड ठरत असून, “हिरकणी”च्या आगमनाने कोयना जंगलात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

