सह्याद्रीमध्ये STR-T1 (सेनापती) व STR-T4 (चंदा) या दोन नर-मादी वाघांची भेट*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते कराड

सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या पुर्ववत करणेसाठी सन 2017 मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादुन (WII) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या संयुक्त सहकार्याने “वाघ पुनर्स्थापना” (Tiger Recovery Project) हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

त्यामध्ये सन 2027 पर्यंत सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये इष्टतम व मुक्त श्रेणीतील वाघांची संख्या स्थापन करुन, पर्यावरणातील अखंडता सक्षम करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी प्रथमतः सन 2017 ते 2022 अखेर “भक्ष्य प्राण्यांची घनता” (Prey Density) वाढीसाठी “Prey Augmentation Program” (भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढ कार्यक्रम) या टप्पा। ची यशस्वी कार्यवाही करण्यात आली. संशोधनानुसार सदरचा टप्पा- यशस्वी झालेनंतर दुसऱ्या टप्प्यातील “वाघ पुनर्स्थापना” (Tiger Recovery Project) टप्पा-॥ साठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास दि. 09.10.2023 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) चौथ्या तांत्रिक समितिने मंजुरी प्रदान करण्यात आली. सदर मान्यतेप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) मधील 8 वाघ (3 नर व 5 मादी) वाघांचे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतरणास मा. पर्यावरण, वन आणि हवामान बदल (MoEFCC) यांनी मंजुरी प्रदान केली. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरवात झाली.

      सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांचा नैसर्गिक अधिवास तयार होणेकरिता सह्याद्री व्याघ्र राखीव प्रशासनाकडून सुरु असलेल्या अथक परिश्रम व प्रभावी व्यवस्थापनामुळे मागील तीन वर्षांपासुन STR-T1, STR-T2 व STR-T3 या तीन नर वाघांची नोंद झाली असुन, त्यांचा सह्याद्रीमध्ये नैसर्गिक अधिवास तयार झाला आहे. परंतू सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांचे नैसर्गिक वाढ व प्रजनन प्रक्रियेचे दृष्टीने मादी वाघांची आवश्यकता असल्याने, प्राप्त मंजुरीप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील STR-T4 (चंदा) व STR-T5 (तारा) या वाघिणिचे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये यशस्वीरित्या स्थलांतरण करण्यात आले. मात्र, सह्याद्रीतील निसर्ग अधिवास तयार झालेले मुळ नर वाघ आणि ताडोबा येथून स्थलांतरित केलेल्या मादी वाघांचा एकत्र वावर होणे, ही बाब अतिशय महत्वपुर्ण होती आणि सदरची बाब यशस्वी होताना दिसुन येत आहे.

    सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सद्यस्थितीत सुरु असलेल्या वाघांचे संनियत्रण पथकाच्या निरिक्षणावरुन व कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या एकत्रित माहितीवरुन मागील एक आठवड्यापासुन, चांदोली वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र आंबामध्ये STR-T1 (सेनापती) व STR-T4 (चंदा) यांचा सोबत वावर असल्याचे सिध्द झाले आहे. त्यांचा एकत्रीत वावर हा जंगलातील नैसर्गिक वर्तनाचा एक भाग असुन, प्रजनन प्रक्रियेच्या दुष्टीने सह्याद्री व्याघ्र राखीवसाठी ही बाब अतिशय महत्वपुर्ण मानली जात आहे.

         STR-T1 (सेनापती) या वाघाने मागील तीन वर्षापासुन सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये नैसर्गिक अधिवास तयार केला असुन, सह्याद्रीमध्ये त्याने दबदबा व विशाल क्षेत्रासाठी ओळख निर्माण केली आहे. तर STR-T4 (चंदा) या वाघिणीने देखील STR-T1 (सेनापती) या वाघाचा अधिवास असलेल्या वनक्षेत्रामध्येच साधारणपणे 35 चौ. किलोमिटर वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवास तयार केलेला आहे. ही बाब अतिशय आशादायी असुन, STR-T1 (सेनापती) व STR-T4 (चंदा) या नर-मादी वाघांचे सोबत वावरामुळे सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वृंदिगत होण्यास मदत होणार आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *