स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनामुळे नागरिकांच्या भावना दडपल्या जात आहेत का? किशोर सोनवणे यांच्या बाजूने आवाज बुलंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड (ता. माण) :

स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्याबद्दल म्हसवड येथील नागरिक किशोर सोनवणे यांना २४ तासांची नोटीस देण्यात आल्याची घटना लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. जनहिताच्या प्रश्नावर शांततामय मार्गाने आंदोलन केल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देणे म्हणजे नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

महावितरणकडून स्मार्ट मीटर हे कायदेशीर बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या मीटरबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याचे अनेक अनुभव नागरिक सांगत असून, त्या शंकांचे निरसन न करता थेट नोटीस देणे हे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

किशोर सोनवणे यांनी आंदोलन करताना कोणतीही हिंसा किंवा अडथळा निर्माण केलेला नसून, “आमच्या वीजबिलात होणाऱ्या बदलांबाबत आम्हाला पारदर्शक उत्तर हवे आहे” अशीच मागणी त्यांनी केली होती. मात्र या मागणीला उत्तर देण्याऐवजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून थेट २४ तासांची नोटीस देण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की,

स्मार्ट मीटरबाबत जनजागृती व विश्वास निर्माण करणे गरजेचे होते.

आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार असून, त्यावर कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे आहे.

एका व्यक्तीवर नोटीस देऊन इतर नागरिकांना घाबरवण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना आहे.

किशोर सोनवणे यांना मिळालेली नोटीस मागे घ्यावी, स्मार्ट मीटरबाबत खुली चर्चा घ्यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या शंका लेखी स्वरूपात दूर कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा या घटनेविरोधात व्यापक लोकआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बाब केवळ एका ग्राहकापुरती मर्यादित नसून, सामान्य नागरिकांच्या हक्कांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *