मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त; प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, प्रतिनिधी:
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड शहरातील व्यापाऱ्यांचे डोळ्यातले पाणी काढले. एस.टी. बसस्थानक ते शिंगणापूर चौक या परिसरात पावसाचे पाणी दुकानदारांच्या गाळ्यांमध्ये घुसले आणि क्षणातच हजारो-लाखोंचे मालसाठे पाण्यात भिजून गेले. व्यापाऱ्यांचे दीर्घकाळ कष्टाने उभारलेले स्वप्न अक्षरशः पाण्यात गेले.

दुकानदारांनी रात्रीभर पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळ्यांमधील साठा वाचवता आला नाही. “डोळ्यासमोर माल भिजताना पाहून काहीच करता आलं नाही, आमचं सर्व संपलयं,” अश्रू दाबत काही व्यापाऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
पालिका प्रशासनाच्या मते या भीषण परिस्थितीला परिसरातील अतिक्रमणे कारणीभूत आहेत. बंदिस्त गटारांवर उभारलेल्या टपऱ्यांमुळे निचऱ्याला अडथळा निर्माण झाला आणि पाणी थेट गाळ्यांत घुसले. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून अपर तहसीलदार मीना बाबर यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पालिकेने पोलिस फौजफाट्यासह अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत स्वतः कारवाईवेळी हजर राहिले. स्थानिक नागरिकांनीही स्वखुशीने अतिक्रमणे काढून घेतल्याने मोहिमेला वेग आला.
पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, “शासकीय जागेवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवा, अन्यथा प्रशासन कठोर कारवाई करेल.”

